चंद्रप्रकाशात भटकणे इतके प्रसिद्ध का आहे?
चंद्रप्रकाशात भटकणे इतके प्रसिद्ध का आहे? (Why Is Wandering In The Moonlight So Famous?)
भटकंती नावाचं जे औषध मानवी मनाला भेटलंय त्याला खरोखरीच तोड नाही. जीवनातल्या तणावावर प्रभावी औषध म्हणून या फिरण्याकडे बघितले जाते. त्यातही गड-किल्ल्यांची सफारी म्हणजे तर रामबाण उपायच! आयुष्यातील कंटाळवाणा, नीरस, शीण तुम्हाला घालवायचा असेल तर एकदा तरी हे रामबाण औषध प्रत्येकाने चाखायलाच हवं. आणि विशेष म्हणजे या औषधाला साईड इफेक्ट मात्र नाहीत.
गडकिल्ल्यांच्या सफारीसाठी खरं तर कुठलीही वेळ आडवी येत नाही. धो-धो बरसणारा पावसाळा असो वा हाडे गोठवणारी थंडी असो..वा अंगाची लाही-लाही करणारा उन्हाळा असो, या सर्वाना पुरून हाडाचे भटके, ट्रेकर पाठीवर सॅक अडकवून द-या-खो-यांत, डोंगर शिखरावर, गड-किल्ल्यांवर, रानावनात, अभयारण्ये-जंगलात आपला आनंद शोधत फिरत असतात. यासाठी या भटक्यांना कोणतीही काळवेळ आडवी येत नाही. अमावस्येची काळी गडद छाया पांघरलेली रात्र असो वा पौर्णिमेचं पिठुर चांदणं असो… या सा-यात ही भटकंती आणखीनच बहरलेली दिसते.
पावसाळा आणि हिवाळा हे खरे तर त्यातल्या त्यात बरे ऋतू. कारण या कालावधीत फिरण्याचा त्रास होत नसतो. त्यामुळेच या कालावधीत तमाम भटक्यांचे पाय हे भिंगरीप्रमाणे पळत असतात. परंतु उन्हाळा म्हटलं की, अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. डोक्यावर आग ओकणारा सूर्यनारायण, त्वचेला बसणारे चटके, डिहायड्रेशनची भीती, पाण्याची भासणारी टंचाई, शरीराचा लागणारा कस, डोळय़ांची जळजळ या सा-यांमुळे उन्हाळय़ात अनेक दुर्गयात्रींचे पाय मंदावत असतात.
Read Other Article : संगीत: मुलांच्या सर्जनशीलतेसाठी प्रभावी
काही जण तर या अडचणींमुळे उन्हाळय़ात ट्रेक करण्याचे देखील टाळतात. परंतु वेळेचे योग्य नियोजन आणि ठिकाणांची योग्य निवड केली की उन्हाळा देखील ट्रेकिंगसाठी सुसह्य होऊ शकतो. यासाठी शीतल चांदण्यातला ट्रेक आयोजित करण्याची देखील सध्या लाट आलीय. त्यामुळे धगधगत्या दिवसातली चढाई टाळून अनेक जण रात्रीच्या शीतल चांदण्यात डोंगर-शिखरांना आपलेसे करतात.
चांदण्या रात्रीतले ट्रेक करण्यात खूप फायदे असतात. दिवसभर उन्हाने कासावीस झालेले आपले शरीर हे रात्रीच्या गडाच्या सान्निध्यात अक्षरश: मोहरून उठतं. खरं म्हणजे रात्रीच्या वातावरणात गडावर जाणवणारा बदल तर खरोखरच अनुभवावा असाच असतो. वर आभाळात पसरलेलं चांदण्यांचं अमर्याद साम्राज्य आणि गडावरून खाली पायथ्याला लुकलुकणारे दिवे आणि या सोबत मित्र-मैत्रिणींचा रंगणारा गप्पांचा फड..आणि यातूनच डोकावणा-या रोमांचकारी इतिहासाचे संदर्भ म्हणजे दुधावर मलई असल्यासारखेच..!
या सर्व आनंदाच्या क्षणात मात्र काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करावाच लागतो. कारण दिवसा ट्रेक करणे हे रात्रीच्या ट्रेक करण्यापेक्षा जास्त सोईचे असते. वन्य श्वापदांची भीती, तसेच सरपटणा-या प्राण्यांमुळे रात्री जास्त खबरदारी घ्यावी लागते. म्हणूनच रात्रीच्या वेळी निघण्याऐवजी तिन्हीसांजेच्या वेळी म्हणजेच संधी प्रकाशात निघाल्यास उत्तम.
तसेच जाताना एखाद्या वाटाडय़ा घेणे केव्हाही चांगले. मुक्कामासाठी गुहा किंवा आकाशाखालची मोकळी जागा निवडली तर आणखीनच मजा येते. झाडाशेजारी किंवा गवताची जागा मुक्कामासाठी कधीही निवडू नका. याशिवाय नेहमीच्या ट्रेकिंग करतानाच्या वस्तू घ्यायला विसरू नये. यामध्ये टॉर्च, शूज, पाणी, औषधे यांचा समावेश होतो.
ही झाली रात्रीची मक्कामाची तयारी! एकदा का गडावर मुक्काम झाला की सारी रात्र गड अनुभवण्यात ती मजा आहे ती खरं तर शब्दांच्याही पलीकडे आहे. याशिवाय मुक्कामानंतरचा पहाटेचा अत्युच्च आनंद देखील आपली वाट पाहत असतो. गडावरून सूर्योदय पाहणे म्हणजे अद्भुतच.
पहाटे काळेभोर आकाश
पहाटेच्या गारव्यात आकाशात बदलत जाणारे रंग हे खरे तर शब्दात उतरवणं कठीणच काम. पूर्व दिशेला उजळणारी सूर्याची किरणे ही आभाळात जणू रांगोळीच रेखाटताना दिसतात. ही पूर्वरंगाची रांगोळी पुसलीच जाऊ नये असे वाटत राहते. असा सुंदर सूर्योदयाचा देखावा दिसतो मात्र छान!
या सा-या गोष्टी ऐकल्या-वाचल्या की मग मन आपोआपच या अशा रात्रीच्या भटकंतीसाठी आसुसतं. म्हणूनच तुम्हाला जर उन्हाळय़ात गड-किल्ल्यांवर भटकंतीचा उत्तम अनुभव पाठीशी हवा असेल तर रात्रीच्या चांदण्यातल्या भटकंती शिवाय पर्याय नाही.
चांदण्या रात्रीसाठी कितीतरी गड-किल्ले हे हॉट डेस्टिनेशन म्हणून भटक्यांच्या यादीत सामावलेले दिसतात. साता-याचा बुलंदगड अजिंक्यतारा, अहमदनगरमधील भटक्यांची पंढरी आणि कोकणकडय़ासाठी ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड, लोणावळा-खंडाळय़ाजवळचा गर्द रानात वसलेला राजमाची किल्ला, गडांचा राजा आणि राजांचा गड असलेला राजिबडा राजगड, दुर्गराज शिवतीर्थ रायगड, नाशिकमधील मनमाडजवळील अंकाई-टंकाईची जोडगोळी, मुघलांना साडेचार वर्षे झुंजवणारा रामशेज किल्ला, महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ला.. हे सारे गड तुम्ही एकदा तरी चांदण्याच्या प्रकाशात बघाच म्हणजे गडांना सुद्धा रात्रीचं वेगळं विश्व असतं हे समजून येईल. गड-किल्ले हे भलेही दिवसाच्या उजेडात रौद्र राकट आणि रांगडे वाटतील; पण रात्रीच्या चांदण्यात हेच गड-किल्ले मात्र गूढरम्य वाटतील आणि गडांच हेच रूप मात्र आपल्याला भटकंतीच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram
Web Search: glade moonlit walk, wandering, moonlight, magic in the moonlight, moonlight mile, moonlit winter, the moonlight, in the moonlight, moonlight 2002, lost in the moonlight, the moon light