संगीत: मुलांच्या सर्जनशीलतेसाठी प्रभावी
संगीत: मुलांच्या सर्जनशीलतेसाठी प्रभावी (Music: Effective for children’s creativity)
संगीताच्या साह्याने विविध आजारांवर उपचार करणे शक्य आहे. प्राचीन काळी रोम व ग्रीक काळात लहान मुलांना संगीत हे विविध भावभावना, संवेदनाशीलता व सर्जनशील वृत्तीची निर्मिती होण्यासाठी शिकवले जाई. आजची पिढी सर्जनशील व जबाबदार झालेली पाहायची असल्यास तिच्यावर संगीताचे संस्कार शालेय वयापासून करणे आवश्यक आहे.
स्वर जर संगीतातील भावभावना व्यक्त करणारी संवेदना असेल तर लय किंवा ताल ही त्यात चेतना व उत्साह भरणारी जाणीव आहे. ध्वनी ही एक भौतिक क्रिया असल्यामुळे त्याचा मेंदू, हृदय, व एकंदरीतच शरीरावर परिणाम दिसून येणे स्वाभाविक आहे. संगीतातील मधुर स्वर अथवा नाद जेव्हा कानावर पडतात तेव्हा आपोआपच तणावाचे शरीरामार्फत उत्सर्जन होऊन मनाला शांतपणा तर येतोच पण त्याचबरोबर ध्यानावस्थेची अनुभूतीही येते. म्हणूनच संगीतातील नाद व स्वरांना ‘मंत्रशक्ती’ असे म्हटले आहे.
Read Article : महाराष्ट्र डायरी – व्हाइनयार्ड्सचा कॉल
सर्वच अध्यात्मिक केंद्रांमध्ये ध्यानधारणेची तंत्रे व पद्धती ह्या संगीतावर आधारित असण्याचे कारणही हेच आहे. प्रयोगांमार्फत असेही सिद्ध झाले आहे, की संगीतामुळे आपल्या शरीरात प्रसन्नता, चैतन्य, उर्जा, शारीरिक बळ यांचा संचार होऊन शरीरात प्राणवायूची वृद्धीही होते व त्यामुळे मानसिक समाधान, स्थैर्य, शांती, दया, प्रेम, करुणा, औदार्य, क्षमा, आत्मीयता व सौजन्य अशा विविध भावभावना अंतर्मनात जागृत होतात.
शास्त्रीय संगीत
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील नाद व स्वरांचा वैज्ञानिकदृष्ट्या कसा उपयोग होईल, यावर जगभरात बरेच संशोधन झाले व त्यात असे दिसून आले, की संगीतामार्फत विविध रोगांवर उपचार करणे शक्य आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनातील वातावरणात, मग ती विद्यार्थीदशेतील वा तरूण पिढीतील मुले असोत; अथवा नोकरी किंवा व्यवसाय करणारे स्त्री-पुरुष असोत, या सर्वांनाच एक निरोगी जीवन देण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीत हे खरोखरंच संजीवनीचे काम करते. त्यामुळे अशा सांगीतिक वातावरणाची सुरुवात शालेय जीवनापासूनच त्यांच्या शिक्षण प्रणालीत अंतर्भूत असेल, तरच उद्याचा भारत व उद्याची भावी पिढी ही नक्कीच रोगमुक्त, तणावमुक्त, सृजनशील व अधिक सर्जनशील असेल यात शंका नाही.
आज यशस्वी होण्याची शाळेतील मुलांची व त्यांच्या पालकांची व्याख्या म्हणजे, उत्तम मार्क मिळवणे व त्यानंतर सीए, इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए, आर्किटेक्ट यांनाच जगण्याची पंचमहाभूते मानून उत्तम पगाराची नोकरी मिळवून दिवसाला दहा-बारा तास काम करून वीकेंडला फिरायला जाऊन एन्जॉय करणे होय. या अशा विचारसरणीमुळेच आजच्या पिढीत स्वार्थीपणा, आत्मकेंद्री वृत्ती, एकलकोंडेपणा व गुन्हेगारीवृत्ती वाढत चाललेली दिसते.
मुलांचा मानसिक विकास
आज शाळांमधूनही संगीत शिक्षकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते; कारण गणित व विज्ञानासारखे विषयच फक्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे व बाकीचे फक्त टाईमपाससाठी हे मुलांवर व पालकांवरही बिंबवले जात आहे आणि पालकांचाही कल या विषयांवर भर देण्यावरच जास्त असतो. हीच विचारसरणी आज शाळा चालवणाऱ्या बऱ्याच संस्थाचालकांचीही दिसते. म्हणूनच आज बऱ्याच मुलांमध्ये मानसिक तणाव व त्या अनुषंगाने येणारे लर्निंग डिसॅबिलिटी, स्लो लर्निंग व त्याचबरोबर अनियंत्रित राग, मग त्याचे गुन्ह्यात झालेले रूपांतर आणि इतर वेगवेगळे मानसिक रोग हे जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात.
Read Article : नवा गडी… नवा खेळ
मुलांची बौद्धिक क्षमता व स्वतः होऊन एखाद्या गोष्टीचा विचार करून त्यावर उपाययोजना शोधण्याची क्षमताच संपुष्टात आलेली दिसते. कारण आज आपण पाहिले, तर जवळजवळ प्रत्येक विषयातच मुलांना तयार दिले गेलेले साहित्य वापरण्याची सवय केली जात आहे, मग ते उत्तराच्या स्वरूपातील असो अथवा एखादे गणित सोडवण्याची पद्धती असो, विद्यार्थ्यांना यातील नेहमीचाच सुनिश्चित रटाळ मुद्द्यांचा आशयच उत्तरात मांडायचा असतो.
यात त्यांनी एखादी आपली पद्धत किंवा एखादा नवीन मुद्दा मांडायचा प्रयत्न केला तर त्याला हटकलं जातं व शिकवलेली पद्धतच अवलंबण्याची सक्ती संबंधीत व्यक्तींकडून केली जाते. हेच कशाला आज किती मुलांचे कार्यानुभव वा तत्सम विषयांमधील प्रकल्प (प्रोजेक्ट) मुले स्वतः पूर्ण करतात, की त्यात ९९ टक्के पालकांचाच सहभाग असतो हे नव्याने सांगायची गरज नाही.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते प्रकल्प मुळातच मुलांच्या सर्जनशीलातेला वाव देणारे नसून त्या-त्या शाळांचे सुशोभीकरण करणारेच प्रकल्प असतात. पण महाराष्ट्रातील ज्या काही तुरळक शाळांमध्ये संगीत विषय आजही जिवंत आहे, अशा शाळांमधील मुलांना प्रोजेक्ट अथवा कार्यानुभव म्हणून दिलेले एखादे गाणे, कविता किंवा काही लयीच्या गमती किती पालक पूर्ण करतात अथवा त्यात रस घेऊन ते पूर्ण करण्यात मुलांना मदत करतात? मुळातच अशा गोष्टींमध्ये मुलांना पालकांची गरजच लागत नाही; कारण यात ते आपली स्वत:ची सर्जनशीलता दाखवून देऊ शकतात आणि म्हणूनच संगीताच्या तासाला मुलांचा उत्साह हा सर्वाधिक असतो, हे प्रयोगांमार्फत सिद्ध झाले आहे. पण आजच्या समाजाची शिक्षणाबाबाताची मानसिकता म्हणजे फक्त मोठी नोकरी मिळवण्यासाठी केलेले कष्ट.
या अशा विचारसारणीचाच परिणाम म्हणून आज मुलांमधील निरागसपणा कुठेतरी हा हरवलेला दिसतो.
सामाजिक दृष्टिकोन
सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय जर पाहिला, तर सांस्कृतिक संस्कार विद्यार्थ्यांच्या बालमनावर रुजवण होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच सांस्कृतिक संस्कारांत वाढलेली आजची विद्यार्थी दशेतील पिढी ही उद्याचे तरुण सामाजिक घटक बनणार आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थी वर्गाला फक्त रोबोट बनवून पैसे कमवायचे फक्त एक मशीन अथवा साधन न बनवता त्यांना माणुसकी जपणे व माणसाला माणूस समजणे, असे विचार ज्या मूल्यांमधून सहज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील, अशी मूल्ये त्यांच्यात वेळोवेळी रुजवत राहणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या शालेय शिक्षण प्रणालीतून या अशा मूल्यांचा प्रसार करण्याचे सहज, सोपे व प्रभावी साधन म्हणजे संगीत.
कारण जितके सांस्कृतिक संस्कार कमी तितकी तरूण पिढीची मने ही श्रद्धाहीन, निष्ठाहीन, असंवेदनशील व एकंदरीच अविचारी व भरकटलेल्या स्थितीत दिसून येतात. म्हणूनच आज शालेय स्तरावर प्रत्येक शाळेतच संगीत विषय अनिवार्य करून असे संस्कार शालेय स्तरावरूनच संगीतामार्फत लहान मुलांमध्ये व्हावे जेणेकरून त्यांच्यामध्ये एकाग्रता, जिद्द, चिकाटी, संयम, मानिसक स्थैर्य, सहयोग वृत्ती हे असे अनेक गुण अंगी बाणवणे खूप सोपे जाईल. संगीतात इतकी शक्ती आहे, की त्यातून नवरस निर्मिती होते व त्यायोगे विविध भावभावनांचे दर्शन होऊन आत्मिक शक्ती सगुण रूपात अवतरल्यासारखे वाटून स्वरांमार्फत त्याची अनुभूती येते.
प्राचीन काळी रोम व ग्रीक काळात लहान मुलांना फक्त तीन विषय प्रथम शिकवले जात असत –
- कवायत
- तर्कशास्त्र
- संगीत.
कवायत ही शरीर सौष्ठव व निरोगीपणासाठी, तर्कशास्त्र हे योग्य दिशेने विचार करण्याची क्षमता व बुद्धीचा विकास होण्यासाठी आणि संगीत हे विविध भावभावना, संवेदनशीलता व सर्जनशीलवृत्तीची निर्मिती होण्यासाठी शिकवले जात असत. संगीताचे महत्त्व ज्या देशांनी जाणले, आज तेच देश महासत्ता बनून प्रगतीपथावर आहेत. आज आपल्या देशातील महत्त्वपूर्ण अशा दोन गोष्तींसमोर संपूर्ण जग झुकते व ते म्हणजे आपले ‘आध्यात्म’ व आपले ‘अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत’.
म्हणूनच या अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा असलेल्या आपल्या भारत देशात याचा भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने विचार करता, बालवयातील अस्थिर व चंचल अवस्थेतील सर्व मनांना एकत्रितपणे अभ्यासाच्या वातावरणात आणून त्यांची बौद्धिक, मानसिकव वैचारिक पातळीला एक चांगल्या विचारांची बैठक देऊन उद्याची सर्वांगीण विकास होऊन एक संवेदनशील, सृजनशील व सर्जनशील अशी जबाबदार पिढी झाल्याचे पहायचे असेल, तर त्यांच्यावर संगीताचे संस्कार होऊन आज शालेय स्तरावर संगीताचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करणे अनिवार्य आहे.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram
Web Search: children’s creativity, creativity in early childhood, creative day care, creativity in early years, the artist’s way for parents, creativity kindergarten, creativity for preschoolers, creative play in early years, childhood creativity, creative day nursery, creativity for nursery