नातीगोती

‘नातीगोती’ म्हणजे समाजव्यवस्थेचं महावस्त्र जणू. महावस्त्राची प्रत्येक धाग्याची आडवी-उभी वीण ही पक्की असावी, ही काळजी घेण्याचा समाजरुपी वीणकर प्रयत्न करीत असतो. पण छे! हा षड‍् रिपूंनी टचाटच भरलेला माणूस कधी राग, कधी द्वेष, कधी लोभ, कधी मत्सराच्या धाग्यांनी महावस्त्रात झोळ निर्माण करतो. कधी धागे तुटतात, निसटतात, सतत गाठी बांधत वस्त्र विणलं जातं. कधी कधी एखाद्या उलटसुलट विणलेल्या धाग्यानं सुंदर, नाजूक वेलबुट्टीही अवतरते. मग महावस्त्राचा बाज आणिक खुलतो. अशा सुरेख लोभस वेलबुट्टीवरून नजर कशी हटेल बरं!

प्रियकर-प्रेयसीचं प्रेमाचं नातं… जिवापाड जपणारं, प्रेमाच्या सागरात आकंठ बुडालेलं. परस्परांत एकरूप झालेलं अस्तित्व. जीवाची बाजी लावणारं नातं. या दुनियेतली प्रेमाच्या नात्याची अनेक मार्मिक उदाहरणं देता येतील. पण, या नात्यात आकस्मित आलेलं वळण हे या नात्याला नेस्तनाबूत करून सोडतं. ऑयेलो-डेस्डीमोना, राजा दुश्यंत आणि वनराणी शकुंतला, साक्षात अयोध्येचा राजा पुरुषोत्तम राम आणि भूमिकन्या सीता. शंकेची, संशयाची एक ठिणगी ही प्रेमभावनेचं रुपांतर हिंसा, द्वेष, रागाचा उद्रेक होऊन प्रेमाच्या हळूवार, तरल नात्याला कलंकित करते. नेस्तनाबूत करते. प्रेमभावनेच्या विविध रुपांनी आपली मानवनाती सजली आहे. असंच एक नातं वात्सल्य, प्रेमानं भारलेलं. आई आणि अपत्याचं नातं. निस्वार्थ नातं.

समर्पण, त्याग, क्षमाशीलता, करुणा, प्रेम आणि सोशिकता व मानवी मूल्यांनी काठोकाठ ओथंबलेलं असं नातं. आई आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ आपल्या संततीसाठी जगत असते. संततीसाठी एकरूप झालेलं तिचं अस्तित्व. गरोदरपणात हाडा-मासा रक्तानं, जिवापाड प्रेमानं जोपासलेलं नातं. सृष्टीवर समग्र प्राणीसृष्टीतही हे नातं शाश्वत आहे. काही कीटक माद्या तर एकीकडे प्रजनन आणि एकीकडे तिचा शेवट, अंत. एकीकडे सर्जनाचा, वात्सल्य, प्रेमाचा आनंद तर दुसरीकडे कायमचीच ताटातूट, दुरावा, वेदनामय अंत. एकूणच प्राणीजगतात हे नातं संघर्षमय, रामभरोसे. तरीही निस्वार्थ प्रेम, वात्सल्य, जिव्हाळ्यानं भारलेलं. 

प्रत्येक काळात हे नातं चिरंतन आहे. परंतु आपल्या मानवी समाजात मात्र या नात्यात अवाजवी अपेक्षा जोडल्या गेल्या. आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिनं आपलं पालन पोषण केलं. सर्वस्वाचा त्याग केला म्हणून आईच्या सर्व अपेक्षा त्या अवास्तव असल्या तरी या नात्याचं उदात्तीकरण केलं जातं. त्यातून विनाकारण दुरावा, नकळत राग भावना, हळूवार नात्यात तुटलेपणा बळावतो.

कुठल्याही नात्यात सहजता असावी. परस्पर नात्यासंबंधीची समजदारी असावी. परिस्थितीनुरूप तडजोडी घडाव्यात. तर कधी दुर्लक्षही करावं नात्यातलं मर्म जपण्यासाठी. नात्याचा पाया हा निखळ, निस्वार्थ प्रेमानं जोपासावा, सांभाळावा. आजचा काळ उत्तर आधुनिकतेचा काळ हा मुलभूत भावनाशील नात्यांना गिळायला बसला आहेच. शेवटी कुठलंही नातं कशासाठी जोपासायचं? जगणं समृद्ध करण्यासाठी. भावनिकता, मानवता जपली जावी. ही जीवाभावाची नाती आपलं जगणं संपन्न करतात. जगण्याचं बळ देतात, प्रेरणा देतात. मनं सांधणारी नाती, मनं जपणारी नाती, परस्परांना घेऊन चालणारी नाती ‘जगा आणि जगू द्या’ चा संदेश देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *