पालकत्व म्हणजे काय?
पालकत्व म्हणजे काय? मुलांना वाढवायचे म्हणजे नक्की काय करायचे? मुलांना बुध्दीमान कसे करायचे? सर्वात महत्वाचे मुलांचा मेंदू घडतो कसा? असे असंख्य प्रश्न आज स्त्रीयांना (आईंना) पडत असतात. या प्रश्नाचे आपण शास्त्रीय उत्तर शोधुया.
या शतकातला शिक्षणक्षेत्रामधला सर्वात मोठा शोध जर कोणता असेल तर तो म्हणजे बालकाचा मेंदू घडतो कसा?
मेंदू मानसशास्त्र सांगत की बाळ जन्मल्यापासून तर पहिल्या सहा वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूची जडणघडण सर्वात जास्त होत असते. या काळात बाळाच्या मेंदूच्या पेशीतील जुळणी चालू असते. ही पेशींची जुळणी जेवढी घट्ट, मजबुत आणि जेवढी अधिक होईल तेवढा बालकाचा मेंदू सक्षम बनेल.
सहावर्षापर्यंत ते बारावर्षापर्यंत सुध्दा मेंदूतील पेशींची जुळणी चालू असते. पण त्यांचे प्रमाण पहिल्या सहा वर्षात जेवढ्या अधिक प्रमाणात होते तेवढे सहा ते बारा वर्षाच्या टप्प्यामध्ये प्रमाण कमी असते.
म्हणजे आपल्या पाल्याला हुशार, बुध्दीमान बनवायचे असेल तर जन्मापासून ते पहील्या सहा वर्षाच्या हा पहिला टप्प्यामध्ये मेंदू मधील करोडो पेशींची कनेक्शन जुळणी दुसऱ्या सर्व पेशी बरोबर होणे आवश्यक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे ६ ते १२ वर्षाच्या वयामध्ये सुध्दा मेंदूच्या पेशींची जुळणी होत असते. पण त्याचा विकास पहिल्या टप्प्यावर अवलंबून असतो. थोडक्यात जन्मापासून ते १२ वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा विकास हा अधिक होत असतो.
आता हा विकास कसा होतो? मेंदूतील पेशींची जुळणी कशामुळे होते? पालकत्वामध्ये काय काय बदल करावे लागेल जेणेकरून बाळ मेंदूची जडणघडण उत्तम होईल?
सर्वात पहिले आपण समजवून घेऊ की मेंदूच्या पेशींची जुळणी कशामुळे होते? कारण जुळणी घट्ट व उत्तम झाली तर मेंदूचा विकास होणार आहे. अर्थात झाली तर मेंदूचा विकास होणार आहे अर्थात बालक बुध्दीमान बनणार आहे.
मेंदूच्या पेशींची बांधणी ही लहानपणी त्याला/ तीला मिळालेल्या अनुभवांवर अवलंबून असते. लहानपणी जेवढे विविध अनुभव पाल्यांना मिळतील तेवढे त्यांचे विविध क्षमतांचा विकास होणार आहे. जेवढे विविध अनुभव तेवढी विविध बुध्दीमत्तांचा विकास होण्याची शक्यता वाढते.
बालकाच्या पाच ज्ञानेंद्रीयांना विविध अनुभव मिळाले तर बाळाच्या मेंदूची जडणघडण उत्तम रीतीने होते. डोळे, कान, नाक, जिभ व त्वचाच्या माध्यमातून मुलांना विविध अनुभव मिळाले तर मेंदूतील पेशींना चालना मिळते व त्यांची जुळणी घट्ट होते. मुलांना कुठकुठले अनुभव देता येतील याच्या संदर्भासाठी काही ऍक्टीव्हीटी सुचवतो पण पालकांनी वया नुसार व त्यांच्या कलेनुसार यासारख्या असंख्य ऍक्टीव्हीटी पाल्याकडून करून घेऊ शकतात.
शारीरिक व भावनिक संवेदनाचा वापर करून मेंदूची कार्यक्षमता व त्याला चालना देता येते. उदा. पाल्यांना सांगणे डोळे बंद करून केस विंचर, डोळे बंद करून कपडे घालणे, डोळे बंद करून आंघोळ करतांना डोके धुवायचे, एकाच वेळी क्लासिकल गाणे ऐकायचे आणि फुलांचा वास घ्यायला, पावसात भिजत पावसाचा आवाज ऐकत बोटांनी वेगळा आवाज करायचा, ढगाकडे बघत क्ले किंवा चिकनमाती घेवून वेगवेगळे आकार करायचे, न बोलता डोळ्यांनी आणि हातवारे करून बोलायचे अशा विविध ऍक्टिव्हिटी करून पाल्यांना कृतीशील करू शकता.
मुलांना हुशार बनवायचे असेल तर मुलांना भरपूर कृतीशील अनुभव द्या. घरात उत्साही वातावरण ठेवायचे. मुलांना सातत्याने चॅलेंज द्या. मुलांना विविध भाषेचे संस्कार दया. सातत्याने संगीत ऐकायला द्या. मुलांची कल्पना शक्ती वाढवायची असेल तर आईने पाल्यांना रोज एक तरी गोष्ट सांगायला हवी. जेव्हा आई मुलाला मांडीवर घेवून थापडते, प्रेम करते, जवळ घेवून गोष्ट सांगते तेव्हा आईच्या स्पर्शाच्या संवेदना मुलांसाठी अविस्मरणीय असतात. अशा संवदेनामधील ऑक्सिटोसीन नावाचे हार्मोन्स स्त्रावते.
शिक्षणतज्ञ रमेश पानसे सांगतात, या होर्मोन्सचा व्यक्तिच्या स्वभावावर खूप मोठा परिणाम होतो. ऑक्सिटोसीन हार्मोन्स असल्यामुळे विश्वासाचे नाते प्रस्तापित होते. जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण बरोबर असेल तर व्यक्ती विचारी, शांत व विश्वासू स्वभावाची बनु शकते. या उलट जर ऑक्सिटोनीचे प्रमाण कमी असेल तर व्यक्ती चिडचिडी, संतापी व संशयी बनते. म्हणून आईचा दररोजचा प्रेमाचा स्पर्श जवळ मांडीवर घेऊन गोष्टी सांगणे आवश्यक आहे.
मुलांची निरीक्षण क्षमता विकसित करण्यासाठी मुलांचे व्हिज्युअल कॉन्टॅक्स विकसित होणे आवश्यक आहे. लहानपणी जितक्या गोष्टींचा अनुभव डोळ्यांना येईल तेवढे व्हिज्युअल कॉरटेक्स पेशी उत्तेजित होत असतात.
त्यासाठी जाणिवपूर्वक मुलांना बाहेरचे जग दाखवा. झाडे, पक्षी, घरे, रस्ते, खेळणारी मुले, येणारी जाणारी वाहने, वेगवेगळयारंगाचे कपडे, नक्षीकाम, रंगकाम अशा विविध गोष्टी मुलांना तीन वर्षापर्यंत दाखवा. गोष्टी दाखवतांना मुलांना प्रश्न विचारुन निरक्षण करायला सांगा. उदा. दोन वर्षाच्या मुलाला गाय दाखवली तर त्याला विचार गाय कशी बघते, शेपटी कशी हलवते व कशी चालते, पोळी कशी खाते? तुला काय म्हणाली का? अशा पध्दतीने प्रश्न विचारले तर बरोबरच मुलांची निरक्षण क्षमता नक्कीच वाढते. मी तुम्हाला एक उदाहरण दिले, तुम्ही या पद्धतीने जत्रेमध्ये, बाजारामध्ये सन-वार विविध कार्यक्रम यापध्दतीने निरीक्षण करायला लावू शकता.
मुलांना मनमोकळी मस्ती करू द्या. त्यासाठी शक्यतो जमिनीवर गादी टाकून झोपा. बेडवर मस्ती केली तर पडण्याच्या भीतीने आपण त्यांना सतत रागवत असतो. मुलांना रोज संध्याकाळी जवळच्या गार्डनमध्ये, मैदानावर किमान दोन तास खेळायला पाठवणे गरजेचे आहे. या वयात शारीरिक वाढ सर्वात जास्त होत असते. आणि त्यासाठी घाम येईपर्यंत खेळणे गरजेचे आहे. पण आजकाल मुलं संध्याकाळी टीव्ही समोर असतात किंवा ट्युशनला तरी असतात. यामध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे.
आजकाल विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले नसते त्यांना लिहीण्याचा कंटाळा येतो त्याचे मुख्य कारण पहिल्या सहा वर्षामध्ये त्यांच्या हातांच्या बोटांचे फाईन-ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट व्यवस्थित झाले नसतात. त्यासाठी मुलांना घरची सर्व कामे करु दया. झाडू मारायला द्या, पीठ मळायला द्या, फरशी फडक्याने साफ करायला द्या. त्यांना त्यांचे कपडे धुवायला द्या. हाताच्या बोटांनी फळे सोलायला द्या, कुंडीमध्ये झाडांना पाणी टाकू द्या अशी छोटी मोठी कामे मुलांनी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानेंद्रियातून जाणे आवश्यक आहे. जसे कान! मुलांना विविध संगीत ऐकवा, मुलांना विविध अर्थपूर्ण आवाज ऐकवा, डोळे बंद करुन विविध भांड्याचा आवाज ओळखायला द्या.
जसं कानाचे अनुभव तसेच जिभेचे अनुभव द्या, त्यांना सर्व प्रकारच्या चवी ओळखायला द्या, मुलांना स्पर्श ज्ञान द्या त्यासाठी वेगवेगळे सरफेसला हात लावू द्या. ग्रॅनाईट, मार्बल, टाईल्स, लाकूड, शहाबादी फरशी, दोरी यांच्यामधील स्पर्शातील फरक ओळखणे, कागदाचे, कापडाचे वेगवेगळे मटेरीअल ओळखणे, द्रव सुरुपातील केरोसीन, ऑईल, दुध, पेट्रोल यांचे स्पर्श हाताला कसा जाणवतो. वेगवेगळी झाडांची पाने जसे की, ओले पान, सुकलेले पान, मोठे-छोटे पानं, वडाची, पिंपळाची, केळीची पानं या सर्वांच्या स्पर्शाचा अनुभव लहानपणीच द्या.
यातून मुलांच्या मेंदूच्या पेशींना चालना मिळते, तो/ती जसे मोठे होतील तेव्हा त्यांना सांगितले की, हे केळीचे पान आहे तर त्याला फक्त माहिती मिळेल, पण मेंदू जडण घडण काळात दाखवले, स्पर्श करू दिला तर त्याच्या मेंदूतील पेशींची जुळणी होते.
मुलांना विविध वास ओळखायला द्या. वेगवेगळ्या फुलांचा सुंगधापासून तर विविध अंतरापर्यंत सर्व वास नाकाला जाणीव पूर्वक घेवू द्या. किचन हे सर्वात उत्तम घरामधली शाळा आहे. स्वयंपाक खोलीमध्ये मुलं विविध गोष्टी शिकू शकतात.
थोडक्यात काय तर विविध अनुभवांनी पाल्याला घडवा. भरपुर किल्ले दाखवा, निसर्ग दाखवा, शेतामध्ये काम करू द्या, नदीचा पुर दाखवा, भाजी-मंडई मध्ये घेऊन जा, मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी भरपूर चित्र काढायला द्या, मुलांना भरपूर नाटके दाखवा, व्यवहार ज्ञान द्या, या अन् अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी तुम्ही करु शकतात. पण आजकाल पालकांकडे वेळ नसतो. स्वत: पालकच ताण-तणावा खाली वावरत असतात. सातत्याने घाई व त्यातून होणारी चिडचिड हे या सर्व गोष्टी मुलं तुमच्याकडून शिकत असतात. आपण कसेही असलो तरी आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असतो.
आपलं वागणं हेच संस्कार असतात. मग आपण लहानमुलांशी कसं वागतो. नेहमी वैतागलेलो, कंटाळलेलो तर मग ते आपल्याकडून हेच शिकणार, आजकाल मुलं खूप लवकर बोर होतात. जर आपले पालकत्त्व अनुभव संपन्न असले तर मुलं बोर होणार नाहीत. आणि त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास उत्तम होईल. बाळाचे पहिले सहा ते आठ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्या वयात पाया भरला जात असतो. पण पालक पाया भक्कम करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठं झाल्यावर कळस बांधण्याकडे वेळ देतात. पालकांनो पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनते आणि सुंदर कळस बांधला जातो.
आता आपण निट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल वरील सर्व अनुभव पुर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात सहज होत होते. पण संस्कृती बदलली. टिव्ही मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढले. विभक्त पध्दत उदयास आली आणि मुलांना हे अनुभव मिळणे कमी झाले. या जमाण्यात मुलांना मिळतात ते फक्त मॉल संस्कृतीचे अनुभव. टच स्क्रिनचे अनुभव, सर्वच गोष्टी डिजीटल झाल्याने मुलांच्या मेंदू विकासासाठी लागणारे खाद्य कमी होत चालले. सातत्याने टीव्ही, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम यामधुन मुलांमध्ये विविध आजार निर्माण होत चालले. जसे ए. डी. एच. डी हॅपर ऍक्टिव पणा वाढत चालला आहे. मुलांमध्ये एकाग्रता समस्या वाढताय. फास्ट फुड मुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या निर्माण होत आहे हे सर्व पालकत्वांची संस्कृती मध्ये बदल होत असल्याने झाले आपले आजी-आजोबा मुलांना मन मोकळ्या पध्दतीने वाढवायचे सुचविलेल्या ऍक्टिव्हिटी एकत्र कुटुंबात सहज होत होत्या. हे सर्व अनुभव शाळा आणि घरातून सातत्याने होणे आवश्यक आहे.
आजही ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले तर ते मोठे व्यावसायिक, अधिकारी होतात. भारतातील बहुतांश आय. एस. एस. अधिकारी, कलेक्टर हे ग्रामीण भागातून असतात. कारण लहानपणी ते निसर्गात वाढतात, शेतात खेळतात, मातीशी नाळ जोडलेली असते. शास्त्र सांगते त्यांच्या मेंदूची जडण घडण उत्तम झाली असते. हेच शहरातील मुलांना कुठलेही अनुभव मिळत नाही. ते फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतात. थोडक्यात आपल्याला पालकत्वाच्या मुळ संस्कृतीकडे येणे आवश्यक आहे. आपलं पालकत्व अनुभवसंपन्न असेल तर येणारी पिढी ही उत्तम घडेल.