new-wicket-new-game-featured-image

नवा गडी… नवा खेळ

नवा गडी… नवा खेळ (New wicket… New game)

 

पूर्वी मैदानी खेळांची चलती होती. घरातील एकतरी युवक एखाद्या खेळात पारंगत असायचा. त्यामुळे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त असायचे. काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकार बदलत गेले. विटीदांडू,कबड्डी, हुतूतू, आट्यापाट्या यांसारखे खेळ हद्दपार होऊन त्यांची जागा टेनिक्वाईट टेबल सॉकर, सेपक टकरा, टग ऑफ वॉर, वुशु या खेळांनी घेतली. यापासून खरच मुलांचा सर्वांगीण विकास होतो का? या मुद्द्यावर मात्र मतभेद आहेत. 

 

 

पूर्वी शहरातल्या कुठल्याही गल्लीत सकाळी अथवा संध्याकाळी मुलांचा ग्रुप जमून पारंपरिक खेळ होत असत. ही गल्ली विरुध्द ती गल्ली, असेही सामने होत असत. मग, त्यात कबड्डी असेल, कधी खोखो असेल, तर कधी आट्यापाट्या, अशा खेळांचे सामने होत. परंतु, गेल्या काही वर्षांत दृश्य बदलले व पारंपरिक खेळ बाजूला जाऊन त्याची जागा क्रिकेटने घेतली. त्यालाही चांगले दिवस आलेले असताना काही परदेशी खेळांनी भारतात शिरकाव केला आणि क्रिकेटची जागा आता परदेशी खेळ घेऊ पहात आहेत.

 

Read Article : एक्सप्लोर करण्यासाठी जयपुर मधील 10 आश्चर्यकारक खरेदी ठिकाणे

 

खेळ

खेळाचा मूळ स्त्रोत ग्रामीण भाग असल्याने तेथेही झपाट्याने बदल होत गेले. ग्रामीण भागामध्ये विटी-दांडू, आट्यापाट्या, लंगडी, लगोरी आणि इतर खेळ सर्रास खेळले जायचे. संध्याकाळच्या वेळी मैदानांमध्ये अथवा मोकळी जागा दिसेल, त्या ठिकाणी गावातील लहान मुलांचा खेळ हमखास रंगलेला असायचा. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस या खेळांबरोबर खो-खो, कबड्डी आदी मैदानी खेळासाठी तुडूंब गर्दी होत असे. अशा खेळातून व्यायामही होत असे. त्यामुळे घरच्यांकडूनही या खेळाला थेट परवानगी मिळत असे. विटी-दांडू, पतंग, लगोरी, भोवरा, आट्यापाट्या, रस्सीखेच असे खेळ सुरुवातीला मुलांना अभिप्रेत होते. मुलींना सागरगोट्या, किस बाई किस, झिम्मा फुगड्या, कोंबडा आदी खेळांमध्ये रस होता. खेळामुळे मन व शरीर निरोगी राहत असल्याने वडीलधाऱ्यांकडूनही खेळाला विरोध केला जात नसे. परंतु, सध्या फारच बदल झाले असून, असे मर्दानी व पारंपरिक खेळ अपवादानेच खेळले जात आहेत. महाराष्ट्रात सध्या नवीन खेळांची चलती आहे. रोज नवीन खेळ येत असून, अनेक खेळांना क्रीडा खात्याने मान्यताही दिली आहे. टेनिक्वाईट टेबल सॉकर, सेपक टकरा, टग ऑफ वॉर, वुशु, २०-२० क्रिकेट, थांगता मार्शल आर्ट, कयाकींग, केनॅकींग, रोप स्कीपींग, जंप रोप, जितक्वांदो, जिजीत्सु, सॉफ्ट टेनिस बेल्ट रेसलींग, टेनिस, थंबरेसलिंग, टेनिस व्हॉलीबॉल, फूटबॉल टेनिस, सर्कल कबड्डी, गटका, टेनिस बॉल क्रिकेट या नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडाशिक्षक व खेळाडूंना या खेळांविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने व याचा प्रसार न झाल्याने या खेळांकडे शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक फारसे वळले नाहीत. या खेळांचे प्रशिक्षण शाळांऐवजी खासगी क्लबच्या माध्यमातूनच खेळाडू घेत आहेत. महाराष्ट्र म्हणजे नवीन खेळांची जननी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुणीतरी एखादा खेळ शोधतो. क्रीडा खात्याकडे त्या खेळाला मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल करतो आणि त्याला बिनदिक्कतपणे मान्यता मिळते, अशी महाराष्ट्रातल्या खेळाची अवस्था आहे. नवीन खेळांना मान्यता देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. तिच्यावरही काही क्रीडा शिक्षक आक्षेप घेत असून, मान्यता देताना मोठा ‘व्यवहार’ होत असल्याचे क्रीडा प्रशिक्षकांचे म्हणणे आहे.

 

माणसाची एक प्रवृत्ती असते. आपल्याकडचे सोडून दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टीला तो जास्त प्राधान्य देतो. ही वृत्ती खेळांबाबत तरी सोडायला हवी. भारतातत्या प्रत्येक राज्याने आपली क्रीडा संस्कृती जोपासली आहे. किंबहुना तिचा प्रचार व प्रसारासाठी सरकारी पातळीवर देखील प्रयत्न केले आहेत. त्याला चांगल्या प्रकारे यश आले असून, महाराष्ट्राने त्यांचा कित्ता गिरवायला हवा. नाशिक शहराचा विचार केल्यास पारंपरिक खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे उगवणाऱ्या संस्थाना सरकारी पातळीवर प्राधान्य दिले जाते. परंतु, जुन्या संस्थांचा वनवास काही संपत नाही. नव्या खेळांविषयी तक्रार नाही. परंतु, जुन्या खेळांना डावलू नका इतकेच म्हणणे आहे.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: new wicket, new game, new games 2021, new games 2020, best new games, new games 2019, new new game, game new game, marvel new game 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *