उंदरगावचा बोंबील विकणारा मन्या झाला सदगुरू मनोहरमामा
उंदरगावचा बोंबील विकणारा मन्या झाला सदगुरू मनोहरमामा
सध्या सर्वीकडेच एकच चर्चा आहे ती म्हणजे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याची. कर्करोग असलेल्या रुग्णाला बरा करण्याच्या नावाखाली फसवणूक केली म्हणून आज मनोहरमामा भोसले है बारामती पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र पोलिस कोठडीत असलेल्या मनोहरमामा भोसलेची बुवा होण्यापर्यंतची कहाणी खूप गमतीशीर आहे.
सिनेमा अभिनेता बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसिरीज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय होत होती. आश्रमातला भोंदू महाराज अत्यंत हुशारीने श्रद्धेचा बाजार मांडून लोकांना कशाप्रकारे भुलवतो, फसवतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला आहे. अशाच प्रकारचे अनेक भोंदूबाबा आपण पाहिले असतील. त्यातील काही सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. मात्र, अशाच प्रकारची काल्पनिक कथा सोलापूरच्या उंदरगावात सध्या सत्यात आली आहे. स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मन्याचा मनोहर मामा कसा झाला? याचा आढावा आपण घेऊया.
करमाळा तालुक्यातील सगळ्यात शेवटचं गाव म्हणजे उंदरगाव. तसं तालुक्यापासून आणि जिल्ह्यापासून दूरवर असलेलं उंदरगाव आता चांगलंच चर्चेत आलं आहे. मनोहर भोसले यानं उंदरगाव शिवारात उभारलेल्या आश्रमात दर अमावस्येला जणू बाजारचं भरत असायचा. ३००० रुपये देणाऱ्यांना लोकांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं जायचं. तर २१००० रुपये देणाऱ्या लोकांना थेट मनोहर भोसलेसमोर उभं केलं जायचं. याठिकाणी येणाऱ्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या मनात मनोहर उर्फ मनोहरमामा भोसले जणू सद्गुरु बाळूमामाचा अवतार अशी प्रतिमा उभी केली जायची. मात्र, आता एक एक करत मनोहर भोसलेचे सगळे कांड समोर येत आहेत.
बोंबील विकणारा मन्याचा सदगुरू मनोहरमामा पर्यंतचा प्रवास!
बारामतीत कर्करोग बरा करण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, मनोहर पासून सद्गुरू मनोहर मामा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्य वाटायला लावणारा आहे.
Read Article : 2021 मध्ये भारताचे नवीन रूप
भूत उतरवायचा धंदा चालत नसल्यानं थाटला आश्रम उंदरगावात!
इंदापूरातल्या लारसुणे गावातला मूळचा असलेल्या मनोहरने वीस वर्षांपूर्वी गावात स्थायिक झाला. डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून आपली गुजराण करत होता. मात्र, हा मनोहर एक दिवस अचानक अदृष्य झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला आणि आजूबाजूच्या गावची लोक भूत उतरवायला त्याच्याकडे येईला सुरवात झाली. मात्र, म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आपल्या अंगात साक्षात बाळूमामा आल्याची घोषणा मनोहर आणि त्याच्या साथीदारांनी केली. पाहता पाहता एकेकाळी मन्या म्हणून ओळखला जाणारा आता ‘सद्गुरू मनोहरमामा’ बनला होता. गावात झोपडीत राहणारा मनोहर शिवारात गेला. दीड एकरात त्यानं भक्तांनी दिलेल्या पैशावर आश्रमही बांधला आणि दिमतीला अलिशान गाड्याही आल्या.
गावकऱ्यांचा विरोध, पण दंडेलाशाहीपुढे चालेना
उंदरगावच्या शिवारात जिथे नीट चालत जाता येत नाही अशा ठिकाणी मनोहरने आश्रम उभा केलाय. अंधश्रद्धेचा बाजार गावकऱ्यांना उघडे डोळ्यांनी पाहावेना. काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर मामाच्या बगलबच्यानी दंडेलशाही केली. पोलिसांपर्यंत जाऊनही काहीच फरक पडला नाही. त्या शिवाय राजकीय लोक आणि नेते मंडळी मनोहर मामाच्या पुढे माथा टेकवत असल्यामुळे मनोहर भोसले याची दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील लोक मनोहर भोसलेच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत. ना ते त्याच्या आश्रमाकडे फिरकतात. मनोहर भोसलेच्या आश्रमात उंदरगाव आणि परिसरातील चार-पाच गावचे लोक जात नाहीत. कारण कारण तिथे काय चालतं याचा अंदाज इथल्या लोकांना आहे. अशावेळी आम्ही तिकडे फिरकतही नाही. त्यामुळे तिथलं काय सांगायचं, असं इथले नागरिक सांगतात.
खाकी आणि खादीच्या जोरावर मनोहरमामाचं थैमान
विशेष म्हणजे स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले भक्तांचं रोगनिवारण करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे अनेकांनी दुर्धर आजार बरे व्हावेत म्हणून या मनोहर मामाकडे हजेरी लावली आहे. मात्र याच मनोहर मामाच्या आईला जेव्हा अर्धांगवायू झाला त्यावेळेस त्याने आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा या मनोहर मामाची शक्ती आणि बुवाबाजी कुठे गेली होती? असा सवाल विचारला जात आहे. उंदरगावच्या शिवारात मांडलेला भोंदूगिरीचा बाजार गावातील लोकांना पसंत नव्हता. याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, खाकी आणि खादीच्या जोरावर मनोहरमामा थैमान घालत होता. मात्र, आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे तो सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram | Twitter | LinkedIn
Web Search: