केके वाघ महाविद्यालयात तीन दिवसीय सायबर साक्षर कार्यशाळा संपन्न
सध्याच्या काळातील सायब साक्षरतेची गरज ओळखून नाशिक येथील केके वाघ महाविद्यालयात तीन दिवसीय सायबर सुरक्षेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या आयटी विभागात या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सायबर तज्ज्ञ ओंकार गंधे आणि सायबर साक्षर यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
७० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध टूल्स चा वापर करून हॅकिंग कसे करता येते, तसेच कसे रोखता येते, याचा अनुभव घेतला. जगाच्या एका कोपऱ्यात बसून आपण लांच्या एखाद्या अनोळखी ठिकाणावरील डिव्हाईस कसे हॅक करू शकतो, सोशल मीडियावर वावरताना हल्लेखोर कसे हल्ले करतात, वेबसाईट कशी हॅक केली जाते, इत्यादी अनेक गोष्टींचे प्रात्यक्षिक याठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळाले.
सायबर तज्ञ ओंकार गंधे यांनी विद्यार्थ्यांना पुढील करियर साठी मार्गदर्शन देखील केले, तसेच ज्यांना सायबर सुरक्षेमध्ये करियर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना आपल्या कंपनी मध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी आयटी विभागाच्या विभाग प्रमुख मृदुला कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांचे आभार मानले. दीपेंदर जांगीड आणि रसिका ठाकूर यांनी तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. काही विद्यार्थ्यांनी आपला कार्यशाळेविषयीचा अनुभव देखील शेयर केला.