नेटवर्कच्या जाळ्यात नातीगोती…
नेटवर्कच्या जाळ्यात नातीगोती
माणूस हा सर्वात भावनाप्रधान, संवेदनशील प्राणी निर्माण झाला आहे. मी एकटाच राहीन, मी एकटाच मोठा होईन. सर्व सुख मलाच हवं आणि बाकी मला कुणी नको ही मुळात कुणाचीही अंतर्प्रेरणा नसतेच. लहानपणी आई-वडील, भावंडे, मित्र-मैत्रिणी यांच्यात तो वाढलेला असतो, तर विवाहानंतर पत्नी आणि मुलं यांच्या गोतावळ्यात तो रमलेला असतो. म्हणून निसर्गानेच समूहाची कल्पना केलेली आहे. त्यामध्ये सुख, शांती, समाधान सर्वाबरोबर वाटून घेण्याची संकल्पना आहे. एकटयाच्या स्वार्थीपणाने पूर्ण सुख कुणालाच मिळालेलं नाही.
पुरुष आणि प्रकृती अशी दोन रूपे आध्यात्मानेही मानली आहेत. स्त्री-पुरुषांची निर्मिती झाली. व्यक्ती या स्वरूपात अनेक स्त्री-पुरुष अस्तित्वात आले. व्यष्टीमधून समष्टी आणि त्यातून समाजरचनेचे अनुबंध तयार झाले. अनेक नातेसंबंध तयार झाले.
आई-वडील, मुलगा-मुलगी, आजी-आजोबा, नात- नातू, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या त्याचप्रमाणे चुलत आते, मामे मावस ही रक्ताची नाती निर्माण झाली. त्याबरोबरच पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, गुरू-शिष्य, शिक्षक-विद्यार्थी, मालक-नोकर, डॉक्टर-पेशंट, वकील-अशील, विक्रेता-ग्राहक अशी अनेकविध नाती समाजरचना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ठरली.
या नातेसंबंधातच आपलं आयुष्य जगायला सर्वसामान्य माणसाला आवडतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीत सर्व प्रकारची नाती टिकवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. माणूस जन्माला आल्याबरोबर नाती सुरू होतात.
Read Article : भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० ची ऐतिहासिक पार्श्वभूमी
काही रक्ताची असतात, काही मानलेली असतात, काही आपण होऊन स्वीकारलेली असतात, तर काही लादलेली असतात, काही नाती छान फुलत गेलेली असतात. प्रेमळ असतात, आश्वासक असतात, धीर देणारी असतात, काही वेळेवर मदत करणारी, निराशेत, दु:खात पाठीशी उभी राहणारी, दिलासा देणारी, आयुष्याला उभारी देणारी असतात. तर काही नाती अतिशय जाचक, नकोशी वाटणारी, आक्रमक, देण्यापेक्षा सतत घेण्याची अपेक्षा ठेवणारी असतात. काही नाती तुमच्या उत्कर्षाच्या आड येणारी, तर काही तुमचा हेवा-मत्सर करणारी, तुम्हाला पाण्यात पाहणारीही असतात.
पण मनुष्यप्राणी हा संवेदनशील, भावनाप्रधान आहे आणि ही भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी नातीच उपयोगी पडतात. दु:खाच्या प्रसंगी सांत्वन करण्यासाठी आपल्याजवळ कुणी असावं त्याचप्रमाणे आनंदाच्या प्रसंगीसुद्धा आपल्या आनंदात कुणीतरी सहभागी व्हावं हीसुद्धा इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. म्हणूनच नात्यांची वीण घट्ट असण्याची आवश्यकता आजच्या एकविसाव्या शतकातही वाटते.
नात्यांचा हा गोफ विणला गेला नाही आणि नाती हरवली तर माणसातलं माणूसपण संपून जाईल आणि तो भावनारहित, संवेदनारहित असा केवळ यंत्रमानव बनेल.
माणसामाणसात मैत्र निर्माण होऊन जीवन सुंदर रितीने जगण्यासाठी नाती जपायला हवीत. म्हणूनच फ्रेण्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे, जगभर साजरे होत असतात. भारतीय संस्कृतीत मातृदिन, राखी पौर्णिमा, भाऊबीज, दिवाळी पाडवा, मकरसंक्रांत यासारख्या सण-उत्सवांच्या मागे हाच हेतू आहे.
आयुष्याच्या वाटेवर एकटं चालत असलेल्या स्त्री-पुरुषांतही सोबत हवीशी वाटू लागली आहे. म्हणूनच एकटंच येणं आणि एकटंच जाणं हे जरी प्रत्येकाचं भागध्येय असलं तरी सुख-दु:खाचे चढउतार असलेल्या आयुष्याला सामोरं जाताना ही नातीगोतीच संजीवनी देतात वाळवंटात फुललेल्या ओअॅसिससारखी.
नेटवर्कच्या जाळ्यात नातीगोती…
सोशल वेबसाईटचा आणि वॉट्सअपचा वापर हा मानवाच्या जीवनशैलीवर कळत नकळत दुष्परिणाम करतोय. या नेटवर्किंगच्या वापरामुळे माणसं एकमेकांपासून दुरावतात आणि संवादाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे नाती तुटतात. पण काही व्यक्तींना जणू याचं व्यसनच जडलंय. त्यामुळे होतंय काय की नैराश्येचं प्रमाण वाढलंय.
फक्त एखाद्दुसर्या व्यक्तीमुळे किंवा ग्रुपमुळे आपण या वेबसाईट किंवा ऍपचा वापर सोडून समाजापासून दूर का जावं बरं… काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मते सोशल ऍप्सचा किंवा वेबसाईटचा वापर हा आपल्या ज्ञानार्जनाकरिता क्विक माहितीकरिता आणि व्यक्तींना व्यक्तीशी जोडण्याकरिता केला तर आजच्या धावपळीच्या युगात हा नेटचा भाग एक ‘मास्टर की’ ठरू शकते, जी तुम्हाला कमी वेळात करेक्ट इन्फॉर्मेशन आणि करेक्ट व्यक्तींशी जोडण्याचा डेटा उपलब्ध करेल.
यासाठी काय करायचं बरं… असा प्रश्न सर्वाना पडला असतो .याचं उत्तरही आहे. आपण फक्त एवढंच करायचं की, ठराविक वेळ निश्चित करायची किंवा आपल्या रुटीन लाईफमधून काही ठराविक क्षण या गोष्टींकरिता राखून ठेवायचे. जेणेकरून तुम्ही अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधू शकता. हा…पण मोजकाच वेळ बरं का…? कारण त्यानंतरचा वेळ हा तुमच्या दैनंदिन कामकाजासाठी, तुमच्या आसपास वावरणार्या व्यक्तींसाठी आणि तुमच्या खास पार्टनरसाठीही डेडिकेट करायचा. तरच आपल्या सेन्सिटिव्ह मनाला या गोष्टींच्या आहारी जाऊ न देता तुम्ही आयुष्यात फरफेक्ट बॅलन्स साधू शकता. ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर काय तर वेल इन्फोर्मेटिव्ह आणि वेल कनेक्टिव्ह पण होईल.
एकूणच काय, तर नेटला आपल्या आयुष्यात किती आणि केवढं स्थान द्यायचं आणि आपल्या सेन्सिटिव्ह हृदयाचा बचाव कसा करायचा हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. तज्ज्ञांच्या मते जीवनात आपल्या आजूबाजूला घडणार्या गोष्टी किंवा या ज्ञानार्जनाच्या गोष्टींचा वापर योग्य तो करून, त्यांचा आपल्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा किंवा त्यांच्या आहारी कितपत जायचं याचा मेन कंट्रोल जर का आपण आपल्या सजग मेंदूकडे ठेवला तर कुठलीही गोष्ट सहज शक्य होऊ शकेल. म्हणून मित्रांनो, तुम्हीच ठरवा की सोशल नेटवर्किंगचा शाप म्हणून दु:स्वास करायचा की वरदान म्हणून त्याचा योग्य तो वापर करून फरफेक्ट गोल अचिव्ह करायचा आणि जीवनाचा आनंद लुटायचा. SO CHEER FRIENDS… STAY COOL AND STAY CONECTED…
सर्व नात्यांमधील मधुर नाते:मैत्री
‘मैत्री’ हा शब्द ऐकून,वाचून अतिशय गुळगुळीत झालेला असला तरी प्राचीन काळापासून तर अद्यापपर्यंत त्याची थोरवी अथवा महत्व हे यत्किंचीतही कमी झालेले नाही. मैत्री म्हटलं की, कृष्ण-सुदामा,अर्जुन- कृष्ण,द्रौपदी-कृष्ण,राधा-कृष्ण,दुर्योधन-कर्ण, यांच्या आदर्श मैत्रीची उदाहरणे आपल्यासमोर उभी रहातात. आजही राजकारणात असो अथवा समाजकारणात अशी आदर्श मैत्रीची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी का असेनात; पण आहेत. संकटाच्या वेळी ढाल होऊन स्वतः वार झेलणारी तर सुखाच्या प्रसंगी पाठीशी उभी रहाणारी,कधी मायेची ऊब देणारी,कधी प्रेमाची सावली देणारी, कानपिचक्या घेऊन वेळीच दोष दाखवणारी मैत्री सगळ्यांच्याच नशीबात नसते. ही श्रीमंती फार मोजक्या लोकांना कमावता येते आणि अर्थातच टिकवता येते. नाहीतर आज रक्ताची नाती सुध्दा स्वार्थासाठी एकमेकांशी दिखाऊपणा करतांना दिसतात. प्रत्येकाच्या वाळवंटी जीवनात असा मैत्रीचा ओॲसिस असावाच लागतो.
Read Article : शिक्षणावरील लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम कसा टाळता आला?
माणूस नात्याच्या जंजाळाने विणल्या गेलेला आहे. यातील सर्व नाती ही रक्ताने मिळालेली असतात. म्हणून ती कशी असावीत,हे माणसाच्या हाती नाही. परंतु मैत्री हे नातेच असे आहे की,स्वभावाचा कोणता ना कोणता धागा जुळल्याशिवाय ती जुळून येत नाही. बऱ्याचदा दोन मित्रांचे किंवा मैत्रीणीची आर्थिक,सामाजिक,बौद्धिक स्तर हा वेगवेगळा असतो,एवढेच काय पण त्यांच्या सवयी,व्यसने,स्वभावही वेगवेगळे असतात. तरीसुद्धा त्या दोघांना किंवा दोघींना एकत्र बांधून ठेवणारा मनाचा धागा असा जुळून येतो. या मनाच्या धाग्याची सर आजकाल ‘फ्रेंडशिप डे’ च्या दिवशी बांधण्यात येणाऱ्या कृत्रिम धाग्याला येणारच नाही. कारण आजचे जग जसे आभासी आहे,तसेच मैत्रीही ही आजकाल आभासीच आहे. फेसबुक किंवा व्हाट्सपवर असणारी आजकालची मैत्री ही फक्त सकाळ,दुपार,संध्याकाळ,रात्र यावेळी न चुकता गुडमॉर्निंग,गुडनू न,गुडइव्हिनिंग आणि गुडनाइटचे सुंदर सुंदर मेसेजेस आणि आदर्शाचे डोस पाठविण्यापलीकडे न जाणारी मैत्री आहे. फेसबुकवर आपल्या पोस्टला लाइक आणि कमेंट देण्यापुरती सीमित असणारी ही मैत्री आहे. एकाच शहरात किंवा गावात राहूनही प्रत्यक्ष भेटीत ओळखही न देणारी मैत्री म्हणजे फेसबुकवरची मैत्री आहे. मग अशा मैत्रीकडून प्रत्यक्षात सुखदुःखात सामील होण्याची अपेक्षा करणे म्हणजे,दिवास्वप्नच ठरेल.फेसबुकवरच्या मित्रमैत्रिणीपैकी प्रत्यक्षात कोणी भेटले तर त्यातून आपल्या पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येईल की काय,अशी भीती बाळगणारी ही ठिसूळ मैत्रीच्या जगात आज लोक वावरत आहेत. फेसबुकवर ३००० मित्रांची यादी असणारा व्यक्ती स्टेटस अपलोड करून आत्महत्या करतो आणि ३००० मित्र त्याच्या या स्टेटसला गंभीर न घेता लाइक दिल्याच्या घटना घडत आहेत.
मैत्रीचे अनेक पैलू आहेत. मैत्री ही दोन मित्रामित्रांत असू शकते,मैत्रीणीमैत्रीणीत, मित्रमैत्रिणीत असू शकते,तशी वयाच्या कोणत्याही वळणावर होऊ शकते. काहींची मैत्री ही अगदी बालवयापासून तर आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत असते. तर काहींची मैत्री ही तारुण्यापासून पुढे चिरंतन असते. काहींची मैत्री ही अल्पायुषी ठरते तर काहींची मैत्री समाजात आदर्श बनून रहाते. पण अशा मैत्रीसाठी असावी लागते, पराकोटीची नि:स्वार्थीवृत्ती,जीवाला जीव देण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईटाचे मिश्रण आहे,ही जाणीव ठेवून मित्र असो अथवा मैत्रीण त्याच्यातील गुणदोषासह त्याला निरलसपणे स्वीकारण्याची वृत्ती!
हळूहळू दिवस बदलत आहेत,तसतसे आपल्या संकल्पना व दृष्टिकोनही बदलत आहेत. मोठ्या शहरात किंवा उच्चभ्रू समाजात मुलगा-मुलगी,स्त्री-पुरुष यांच्या मैत्रीकडे निकोपपणे पहाण्याची वृत्ती निर्माण झाली,परंतु ही हीच वृत्ती मध्यमवर्गीय समाजात अजून आलेली नाही. भिन्नलिंगी मैत्री म्हटले की, आज एकविसाव्या शतकातही मध्यमवर्गीयांच्या आश्चर्यमिश्रीत नाराजीने भुवया उंचावल्या जातात. समविचारी,समउद्देशी लोक मग ते स्त्री-स्त्री असू शकते,पुरुष-पुरुष असू शकते अथवा ते स्त्री-पुरुष असू शकते,हा विचार मध्यमवर्गीय करत नाहीत. आजही कितीही पवित्र उद्देशाने स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी यांच्यात मैत्री असली तरी समाज मात्र त्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पहात असल्याने अशी मैत्री अजून आपल्यात रुजलेली नाही.
आज जागतिक मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाई एकमेकांच्या मनाने जोडल्या गेली की नाही माहीत नाही. आजकालचे युग हे “सेलिब्रेशन” चे युग आहे. आज नात्याची वीण हळूहळू उसवताना दिसते आणि दुसरीकडे मात्र याच बाबींचे “सेलिब्रेशन” मात्र तेवढ्याच घट्टपणे रुजले आहे. हा विरोधाभास आजच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने एकमेकांना मैत्रीचे प्रतीक म्हणून धागा बांधून मैत्रीदिवस साजरा करण्याच्या योगाने कमी व्हावा,एवढीच शुभेच्छा! आणि प्रत्येकाला जीवनात एकतरी कृष्णासारखा मित्र लाभावा,ही सदिच्छा! कारण जगातील सर्वात सत्य,सुंदर आणि मधुर नाते कोणते असेल तर ते आहे मैत्रीचे!
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram | Twitter | LinkedIn
Web Search: