जागतिक पातळीवर इंडोनेशिया एक प्रमुख पर्यटन स्थळ
इंडोनेशिया
जागतिक पातळीवर इंडोनेशिया एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इंडोनेशियाला निसर्गसंपन्नतेचे मोठे वरदान प्राप्त झाले आहे. इंडोनेशियातील बाली, माउंट अगुंग, जावा यांसारख्या भागातील अनेक ठिकाणे अद्भूत अशीच आहे. इंडोनेशियातील निसर्ग, समुद्रकिनारे आणि एकंदरीत वातावरण पाहून एकदम भारावून जायला होते. दुसरीकडे, भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव इंडोनेशियावर असलेला पाहायला मिळतो. इतकेच नव्हे तर, २० हजार रुपयांच्या नोटेवर थेट गणपतीचे छायाचित्र पाहायला मिळते. यावरूनच भारतीय संस्कृती, भारतातील देवी-देवता, भारतीय परंपरा, भारतीय तत्त्वज्ञान इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात मानले जाते, हे सिद्ध होते. जगातील प्राचीन मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या हिंदू देवतांची अनेक भव्य आणि ऐतिहासिक मंदिरे इंडोनेशियात आहेत.
शिवलिंगात अमृत
इंडोनेशियातील जावा बेटावर संशोधन करत असताना एक पुरातन हिंदू मंदिर सापडले. या मंदिरात एक शिवलिंग आढळले असून, या शिवलिंगाची वेगळेच आणि अद्भूत असे महत्त्व आहे. हे शिवलिंग स्फटिकापासून तयार झाले असून, यातील द्रव पदार्थ आजपर्यंत कधीच सुकला नाही. हा द्रव पदार्थ अमृत असल्याची भावना स्थानिकांची आहे. हा नेमका कोणता पदार्थ आहे, याचा शोध अनेक वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी घेतला. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही.
विष्णू मंदिर
इंडोनेशियातील बाली बेटावर भगवान विष्णूंचे एक मंदिर आहे. आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्रातील एक मोठ्या शिळेवर हे मंदिर आहे. १६ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले होते. अलौकिक सौंदर्यामुळे इंडोनेशियातील पर्यटनस्थळांमध्ये या मंदिराचा क्रमांक वरचा लागतो.
सरस्वती मंदिर
बाली येथील उबूद येथे तमन सरस्वती मंदिर प्रसिद्ध आहे. विद्येची आणि संगीताची देवता म्हणून सरस्वती देवीचे येथे पूजन केले जाते. मंदिर परिसरात दररोज सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच येथील एका कुंडामुळे हे स्थान अधिक लोकप्रिय झाले असून, पर्यटक आवर्जुन येथे भेट देतात.
पुरा बेसकिह मंदिर
बालीतील माउंट अगुंग येथे हे मंदिर बांधण्यात आले असून, इंडोनेशियातील सर्वांत सुंदर मंदिर म्हणून याची स्वतंत्र ओळख आहे. १९९५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसांच्या यादीत या मंदिराचा समावेश केला. या मंदिरात अनेक देवी-देवतांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. जगातील अनेक भाविक आणि पर्यटक या मंदिराला आवर्जुन भेट देतात.
सिंघसरी शिवमंदिर
पूर्वोत्तर जावा येथील सिंगोसरी भागात सिंघसरी शिवमंदिर बांधण्यात आले आहे. १३ व्या शतकात या मंदिराची उभारणी केली असून, भगवान महादेवाचे महाकाय व अलौकिक स्वरूप येथे पाहायला मिळते. शिवशंकराचे अनेक उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. येथील परिसराचे वर्णन शब्दांत केले जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक पर्यटक व्यक्त करतात.
प्रम्बानन मंदिर
जावा येथील प्रम्बानन मंदिर त्रिदेवांना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित केलेले आहे. युनेस्कोने हे मंदिर जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. या मंदिरात दररोज पूजाविधी केला जातो.