msakshar

घर असावं… सुंदर आपुलं…

घर असावं… सुंदर आपुलं…

 

 

स्वतःचे हक्काचे घर ही प्रत्येकाची गरज झाली आहे. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते. दिवसभर काबाडकष्ट करून थकूनभागून येणारा माणूस स्वतःच्या घरात येतो, तेव्हा विश्रांतीचे व समाधानाचे क्षण अतुलनीय असतात. उद्याच्या नव्या लढाईला, संघर्षाला सज्ज करण्याचे बळच ती वास्तू देत असते. आर्थिक पाठबळ आता कमी त्रासात उपलब्ध होत असल्याने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे सोपे होऊ लागले आहे…

घर म्हणजे चार भिंती, खिडक्या-फर्निचर एवढेच नसते, तर आपल्या जीवनातील सुख-दुःखाची साक्षीदार असलेली ही वास्तू आपला आनंदही व दुःखही पाहते. आपल्या घरात, बंद दाराच्या आत आपल्याकडे काय आहे वा नाही, हा आपला स्वतःचा विषय असतो. पण आपल्या नावाचे घर आहे, तेथे कुटुंबीयांसह राहतो, थकवा दूर करणारे, आनंदक्षण देणारे घर संघर्षाला नवे बळ व उभारी देणारे आहे, हा विचारही मन उल्हसित करणारा असतो.

 

Read Article : प्रत्येकजण गॉसिप करतो – आणि हे सर्व वाईट नाही

 

माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणसाचं घराशी भावनिक नातं असतं. घर म्हणजे माणसाचं शारीरिक, मानसिक रक्षण करणारं सुरक्षाकवच असतं. माणसं घरांना घडवतात, आणि घरंही माणसांना घडवतात. घर करणं ही माणसाची मूलभूत वृत्ती आहे. टोळी करून भटकणारा माणूस शेती करू लागला; घर बांधून एका ठिकाणी राहू लागला आणि माणसाच्या जीवनाला स्थैर्य आलं. घर या संकल्पनेतच स्वास्थ्य आहे. घर म्हणजे केवळ खांबाभिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. घर माणसांना निवारा देणारं सुखकर विश्रांतिस्थळ असतं. घराच्या व्याप्तीत भोवतीचा परिसरही असतो. घरापर्यंत नेणारा रस्ता, त्याची वळणं, खाणाखुणा, एखादं आवडतं दुकान, बाग यांच्याबद्दलही मनात आपलेपणा असतो. जुनी घरं पाडली जातात तेव्हा स्वत:वरच घाव पडल्यासारखं वाटतं. तो अनुभव प्रिय व्यक्तीच्या मरणासारखा असतो.

घर आपलं जिवलग बनतं म्हणूनच प्रिय व्यक्तीसारखी घराची ओढ लागते. पाय घराकडे ओढ घेतात. घर डोळ्यांना कधी दिसेल असं होतं. घराच्या भिंती दमल्याभागल्यांना त्यांच्या गुणावगुणांसकट पोटाशी घेतात. घराच्या खांद्यावर डोकं टेकून दु:खभार हलका करता येतो. एकटं जगणाऱ्या माणसालाही मित्रत्वाच्या भावनेनं घर सोबत करतं. घरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप काही सोसावं लागतं. माणसांप्रमाणेच घरांनाही जीव लावावा लागतो. त्यांचं दुखलं खुपलं पाहावं लागतं.

घराची सत्त्वपरीक्षा होते ती वादळवाऱ्यांत, संकटकाळात. घरातील माणसांत बेबनाव झाला, घर दुभंगायची वेळ आली, कोणाचा मृत्यू ओढवला; तर घरालाही पोरकेपण येतं. घरावर शोककळा पसरते. ती उदासवाणी दिसू लागतात. अशा वेळी धीरानं आणि समजूतदारपणे घर सावरावं लागतं. ज्या घरांचा पाया मजबूत विचारनिष्ठेवर आधारित असतो; आधारखांबांचा कणा ताठ असतो, भिंतींपाशी सोसायची ताकद आणि प्रगल्भता असते ती घरं मोडता मोडता सावरू शकतात. नव्यानं स्वत:ला घडवू शकतात. माणसाच्या मनामध्ये त्याच्या जीवनात आलेल्या घरांच्या आठवणींचं गोकुळ नांदत असतं. घरांची दालनं, जिने, दारंखिडक्या, गच्च्या, व्हरांडे, अंगणं, त्या अंगणात सळसळणारी झाड यांच्याभोवती आठवणींचं मोहोळ लगडलेलं असतं. प्रत्येक घराचं वेगळं व्यक्तिमत्त्व. घराशी जुळलेल्या आठवणीही भिन्न भिन्न. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणूस त्यात गुंतून जातो. आठवताना मनात हुरहूर दाटून येते.

माणसांप्रमाणेच घरंही आयुष्यातून निघून जातात. कधीच न परतण्यासाठी! घरांची ताटातूट जीव कासावीस करते. माणसाला जुन्या घरांची ओढ लागते. त्यांना भेटून यावंसं वाटतं.

 

 

विकतचे घर घेणे सोपे…

 

 

काळ बदलला तसा मानवी जीवनातही आमूलाग्र बदल झाला. औद्योगिकीकरण व कृषी विकास जसा होत गेला, तशी आर्थिक समृद्धी येत गेली व स्वतः घर बांधण्यात वेळ घालविण्यापेक्षा तयार घर घेणे जास्त श्रेयस्कर मानले जाऊ लागले. त्यानंतरच गृहप्रकल्पांना चालना मिळाली. जमीन व बांधकाम साहित्यखरेदी, तसेच मजुरांची शोधाशोध, कामावर देखरेख या सगळ्या सव्यापसव्यापेक्षा तयार घर घेणे

काहीसे महाग जात असले तरी अन्य त्रास नसल्याने सोयीचेही होऊ लागले. ग्राहकांची जसजशी गरज वाढू लागली, तसतसा बांधकाम व्यवसायही बदलत गेला.

 

Read Article : अविवाहित जोडपे लॉजवर सापडल्यास घाबरून जाऊ नये कारण कोणतीही शिक्षा होणार नाही

 

पूर्वी घर घेताना शासकीय नोकर आपली आयुष्यभराची कमाई घराच्या उभारणीसाठी वापरायचे. त्यावेळी बहुदा निवृत्तीनंतरच स्वतःचे घर होण्याचे स्वप्न आकाराला येत असे. मोठी व्यावसायिक मंडळीही व्यवसायातील चढ-उतारात व्यस्त असल्याने स्वतःचे घर या संकल्पनेला फारसे महत्त्व देत नसायची. छोट्या व्यावसायिकांना तर स्वतःच्या घरासाठीच्या गुंतवणुकीपेक्षा उपलब्ध उत्पन्नातून कोठेतरी भाडोत्री राहणेच बरे पडायचे. पण कुटुंबे विभक्त होऊ लागली, घरातील मुले-मुली शिक्षणानंतर नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाऊ लागली, वा कुटुंबातील सदस्यसंख्या वाढल्यावर राहते घर अपुरे पडू लागले, त्यानंतर नव्या घराची संकल्पना स्वीकारली जाऊ लागली. या संकल्पनेला पाठबळ मिळाले ते बँकांनी पुढाकार घेतल्यावर.

कृषीविकास व औद्योगिक विकासाला प्राधान्य देणाऱ्या बँकिंग क्षेत्राने गृहप्रकल्प व वाहनकर्ज सुविधा सुरू केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांना झाला. एकीकडे स्वतःच्या दुचाकी-चारचाकी वाहनाचे स्वप्न साकारताना, दुसरीकडे स्वतःचे हक्काचे घरही आकाराला येऊ लागले. बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडावे लागत होते, पण उत्पन्नाच्या प्रमाणात हे हप्ते असल्याने त्याची फारशी अडचण जाणवत नव्हती. उलट, तरुण वयात स्वतःचे घर व गाडी घेण्याचे स्वप्न साकारल्याचा आनंद आगळावेगळाच होता. आजही हा आनंद शतपटीने वाढला आहे. अनेक फायनान्स कंपन्या, बँका, मल्टिस्टेट संस्था घरासाठी अर्थपुरवठा करीत आहेत. त्याचा लाभ नोकरदारांसह छोटे-मोठे व्यावसायिकही आवर्जून घेत आहेत.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here 

Follow us at, Facebook | Instagram | Twitter | LinkedIn

 

Web Search: sweet home, home sweet home, sweet home tv-series, home sweet home quotes, home sweet home article, article on happy family.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *