गुन्हेगारी वाढली; तपास थंडावला!
गुन्हेगारी वाढली; तपास थंडावला! (Crime increased; The investigation has cooled down!)
वाढत्या शहरीकरणाबरोबरच लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर यासारख्या शहरांमध्ये ते दिसून येत आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे कमी होत असले तरी चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मात्र लक्षणीय वाढ होत आहे. या तुलनेत या गुन्ह्यांच्या शोधाचे प्रमाण नगण्यच आहे.
गुन्हेगारी
गेल्या काही वर्षात नाशिक शहराची वाढ झपाट्याने झाली. अशाच पद्धतीने धुळे आणि जळगाव शहराचीही झाली. मात्र, रोजगाराच्या संधी नाशिकला अधिक असल्याने त्याचे प्रमाण मोठे होते आणि आहे. शहरीकरण वाढते आहे, ग्रामीण भागातून शहराकडे येण्याचा कल मोठा आहे, असे वारंवार बोलले जाते आणि त्यावर चिंताही व्यक्त केली जाते. त्यापलीकडे मात्र त्याकडे बघितले जात नाही. वाढत्या शहरीकरणाची काही वाईट अपत्येही आहेत. त्यातीलच एक म्हणजे गुन्हेगारी. रोजगाराची संधी हिरावली गेली किंवा उत्पन्न मिळेनासे झाले की गुन्हेगारीकडे व्यक्ती जातात, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय पैसा, प्रतिष्ठा यासारख्या बाबी मिळविण्याचा शॉर्टकट सुद्धा गुन्हेगारीत आहे, असा समज असल्यानेही गुन्हे वाढतात.
छोट्या गुन्ह्यांमधून आलेला शहाणपणाच मोठ्या गुन्ह्यांचे धाडस करायला लावतो. उन्हाळ्याच्या सुट्या लागण्यापूर्वीच नाशिक शहरात चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. गुन्ह्यांच्या या तुलनेत त्याचा शोध घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हीच बाब संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आहे. खुद्द पोलिसांकडेच असलेली आकडेवारी ते सिद्ध करते.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे आहे. त्यांचे कार्यालय नाशिकमध्येच आहे. विनयकुमार चौबे यांच्याकडे त्याची धुरा आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांना आणि मंत्रालयालाही अधिकृतपणे माहिती देण्याचे काम या कार्यालयाकडून होते. २०१३ ते २०१६ या काळातील उत्तर महाराष्ट्रातील गुन्हेगारीवर नजर टाकली, तर अनेक बाबी निष्पन्न होतात. या चार वर्षांत उत्तर महाराष्ट्रामध्ये चेन स्नॅचिंगच्या एकूण १५२२ घटना घडल्या. मात्र या घटनांचा शोध घेण्यात पोलिस असमर्थ ठरले.
अवघ्या ३५ टक्केच घटनांची उकल पोलिसांना करता आली. चेन स्नॅचिंगसारख्या घटना या खासकरून नवोदित गुन्हेगारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात. सर्वसामान्यांमध्ये दहशत तयार करण्याबरोबरच त्यांचे मोठे नुकसान करणाऱ्याही असतात. चेन स्नॅचिंगचा मोठा परिणाम समाजावर होतो. पोलिसांना खबर मिळत नाहीत की ते अशा गुन्ह्यांचा शोधच घेत नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
Read Article : लोक नेहमीच आरोग्य म्हणजे संपत्ती असे का म्हणतात ?
घरफोडी हा एक गुन्हा गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे. बंद घरे ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणीच ठरते आहे. किरकोळ वस्तूंच्या चोरीपासून, तर मोठा ऐवज लंपास करण्यापर्यंत घरफोडीचे शस्र गुन्हेगारांकडून वापरले जात आहे. चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यात सराईत झालेले गुन्हेगार घरफोडीकडे वळतात, असे पोलिसांचेच निरीक्षण आहे. घरांवर पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास घरफोडी करण्याचे प्रकार बळावत आहेत. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर घरफोडीचा आलेख वाढलेला आहे. २०१३ मध्ये उत्तर महाराष्ट्रात घरफोड्यांची संख्या १२५३ एवढी होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ होते आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी हा आकडा तब्बल ४९६४ एवढा झाला आहे. म्हणजेच हे प्रमाण चारपटीने वाढले असले तरी त्यांच्या शोधाचे प्रमाण मात्र समाधानकारक नाही.
अवघ्या २२ टक्के घरफोड्यांचाच परामर्श घेणे पोलिसांना जमले आहे. ही सुद्धा चिंतेचीच बाब आहे. काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी आपत्ती कोसळावी असाच हा प्रकार आहे. पोलिसांच्या कारभाराला ही बाब शोभणारी नाही. घरफोड्या होत असल्याने सुट्यांच्या काळात गावी जावे किंवा नाही, असा प्रश्नही नागरिकांना पडतो. त्यामुळे पोलिसांप्रती निर्माण झालेला अविश्वासही यातून प्रतीत होतो.
चोरीच्या घटना या तर नित्याच्याच आहेत. पण, गेल्या काही वर्षात चोरीच्या प्रकारांमध्ये राजरोसपणे जी वाढ झाली आहे ती खरे तर पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३मध्ये ३९९० असलेले सर्व प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण २०१६मध्ये थेट १६ हजार ३८९ वर येऊन पोहचले आहे.
म्हणजेच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चौपट वाढ झाली आहे. या गुन्ह्यांमध्येही केवळ ३५ टक्केच शोधकार्य झाले आहे. चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरी या तिन्ही गुन्ह्यांमध्ये उघड होण्याची टक्केवारी सरासरी केवळ ३० एवढीच आहे. म्हणजेच, समजल्या जाणाऱ्या पण गुन्हेगारांचा विश्वास दृढ करणारे गुन्हेच प्रभावी होत असल्याचे यातून सिद्ध होत आहे.
नाशिक शहरात पोलिस आयुक्त, जिल्ह्यात पोलिस अधीक्षक तर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यात पूर्णपणे पोलिस अधीक्षकांद्वारे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली जाते. उत्तर महाराष्ट्रात वाढणारे गुन्हे आणि या गुन्ह्यांचा शोध घेणारी यंत्रणा या साऱ्याच बाबी यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे गुन्हे वाढूनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत आणि गुन्हा घडूनही त्याची उकल होत नाही, ही बाब पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी तो खबऱ्यांवर खर्च होतो का आणि झाला तरी तो कितपत फायदेशीर ठरतो, असा प्रश्न निर्माण करणारी आकडेवारीच गृहविभागाकडे आहे. राज्याच्या गृहखात्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांचाच अंकुश आहे. असे असतानाही पोलिसांची कार्यपद्धती सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. चोरी ते घरफोडी यासारखे गुन्हे एखाद्या कुटुंबाला मोठा हादरा देणाऱ्याही ठरतात. कारण, अनेकांची मोठी मालमत्ता गमावल्याने त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होतो. असे असतानाही या घटना घडू नये यासाठीच पोलिसांनी कारभार हाकणे गरजेचे आहे.
मात्र, सद्यस्थितीत या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होणे हे पोलिसांनाही शोभणारे नाही. तर, गुन्हे घडूनही त्यांची उकल न होण्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचेच वातावरण तयार होत आहे. पोलिसमित्र आणि अन्य संकल्पना चांगल्या असल्या तरी पोलिसांप्रती आदर निर्माण व्हावा, असे चित्र नाही. त्यामुळे ही बाब अतिशय खेदाचीच म्हणावी लागेल. उत्तर महाराष्ट्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.
सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांचा शोध घेणे आणि हे गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे. ते पेलताना पोलिसांनी त्यांच्यातील कार्यक्षमतेचा वापर केला तर सहाजिकच त्यांच्याविषयी नागरिकांना आस्था वाटू लागेल. त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न होतील, अशी अपेक्षा उत्तर महाराष्ट्रवासीयांना आहे.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram
Web Search: crime investigation, criminal investigator, crime investigation department, fraud investigator, forensic detective, criminal intelligence analyst, special crime investigation, detectives and criminal investigators, cyber crime investigation, crime scene analyst, homicide , investigator, types of crime scene, cyber crime unit