msakshar-article-career-plan-after-10th-featured-image

दहावीनंतरचा करिअर प्लॅन (Career plan after 10th)

(Career plan after 10th) दहावीनंतरचा करिअर प्लॅन

(Career plan after 10th) दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर विद्यार्थी तसंच पालकांच्या मनात ‌करिअरविषयक असंख्य प्रश्न असतात.दहावीनंतर कोणत्या साइडला जायचं? कोणतं करिअर निवडायचं? असे अनेक प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असता.

करिअर निवडताना दूरगामी विचार करा.

आपल्याला नेमक काय आवडतं? आपला कल कुठे आहे?

हे प्रश्न स्वतःला विचारा आणि करिअरची निवड करा. हा करिअरचा पाया भक्कम करून मगच पुढे खऱ्या अर्थाने आपल्या करिअरची वाटचाल करा.

असं मोलाच मार्गदर्शन सुचित्रा सुर्वे यांनी केलं.

 

msakshar-article-career-plan-after-10th-image-1

 

नोकरीबरोबरच बिझनेसचाही विचार करा

  • करिअरमध्ये तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. स्वतःचा बिझनेस उभा करण्याकडेही कल असू द्या.
  • दहावीनंतर कॉलेजबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध बिझनेस हाऊसेस, इंडस्ट्री, फर्म्स, मीडिया हाऊसेसमध्ये पार्टटाइम नोकरी किंवा इंटर्नशिप करावी. आजच्या स्पर्धेच्या युगात थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलदेखील महत्वाचं आहे.
  • विद्यार्थी नेहमी लोकप्रिय किंवा ऐकायला छान वाटणाऱ्या कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून कशीबशी हजारो मुलं उत्तीर्ण होतात. पण त्यातली अनेकजण बेरोजगारच राहतात.
  • याउलट तुमची आवड, बौद्धिक क्षमता, कल यांची योग्य सांगड घालून निर्णय घ्या आणि आपलं करिअर निवडून यशस्वी व्हा!

 

शिक्षणातच दडलंय भविष्य

  • दहावीनंतर करिअरचा खरा टप्पा सुरू होतो. विद्यार्थी अशावेळी खूप गोंधलेले असतात
  • स्वतःची पारख करणं आणि आपल्या शिक्षणाचा समाजासाठी वापर करणं ही शिक्षणाची दोन मुख्य उद्दिष्टं आहेत. पगार, पद, नोकरी या पलीकडे जाऊन शिक्षणाचं महत्व जाणून घेणं आवश्यक आहे.
  • शिक्षणातच तुमचं व समाजाचं भविष्य दडलेलं आहे. आजपर्यंत शाळेमध्ये एका सुरक्षित वातावरणात विद्यार्थी राहिलेले असतात. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांमध्ये एक अनौपचारिक नातं असतं.
  • परंतु कॉलेज विश्वात तसं काही नसतं. कॉलेजमध्ये तुम्हाला जितकं स्वातंत्र्य मिळतं, तितकीच तुमच्यावरची जबाबदारीही वाढते.
  • कॉलेज कोणतंही असलं तरी तुम्ही तिथे काय-काय करता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे.

 

पालकांची भूमिका

पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की दहावीनंतर विद्यार्थ्याला करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बऱ्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा?

  • हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल जाणून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करिअर करायचं आहे, हे समजून घ्या.
  • तसंच यात विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणंही महत्त्वाचं आहे. पालकांनी विद्यार्थ्यांमधल्या क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला एखाद्या शाखेकडे ढकलणं साफ चुकीचं आहे.
  • पालकांनी आपल्या आवडींचा व अपेक्षांचा त्यांच्यावर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनीच डॉक्टर, इंजिनीअरिंगचा अट्टाहास ठेवू नका.
  • चांगले मार्क्स मिळवणारी मुलंही आर्टसकडे वळत आहेत. ही आशादायी बाब आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीचं नातं निर्माण करायला हवं.

 

Read Article : महाराष्ट्र डायरी – व्हाइनयार्ड्सचा कॉल

 

फाइन आर्टस / परफॉर्मिंग आर्टस

  • संगीत कला, नाट्यकला, नृत्यकला, आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अँड पॉटरी, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन, स्कल्प्चर अशा कलांशी संबंधित विषयांमध्ये आवड असणारे विद्यार्थी यातही करिअर करू शकतात.
  • मात्र त्यासाठी विषयांची खऱ्या अर्थाने आवड आणि कौशल्य असावं लागतं. लहानपणापासून या विषयांचा सराव असल्यास यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.
  • मास्टर इन थिएटर आर्टस, बॅचलर इन फाइन आर्टस, बॅचलर इन डिझाइनिंग यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
  • त्याचप्रमाणे प्रोडक्ट डिझायनिंग, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझायनिंग, ग्लास डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि अॅनिमेशन इत्यादी अभ्यासक्रम यात आहे.
  • या सर्वात विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीवर खूप भर द्यावा लागतो.

 

संरक्षण

  • हवाई दल, भूदल, नौदल या संरक्षण विभागातही उत्तम करिअर संधी आहे. शारीरिक चाचण्यांमधून पार पडल्यावर यात प्रवेश घेता येतो.
  • मात्र दहावीनंतर यात अधिकारी पदावर जाता येत नाही. त्यासाठी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असतं. सीआरपीएफ , बीएसएफ, आयआयबीपी, सीआयएसएफ अशा पॅरामिलिटरी फोर्समध्येही संधी आहे.
  • कोणत्याची शाखेतून पदवी घेतल्यानंतर आर्मी, नेव्हीसाठी परीक्षा देता येते. परंतु इथेही प्रवेश परीक्षा असते. तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर आर्मीसाठी आयएमएचं एका वर्षाचं प्रशिक्षण तर नेव्ही आणि एअरफोर्ससाठी त्या-त्या प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुक्रमे एक व दीड वर्षाचं प्रशिक्षण दिलं जातं.
  • यानंतर अधिकारी पदावर नेमणूक होते. यात एक प्रतिष्ठित आणि अभिमानास्पद करिअर तुमची वाट पाहत उभं असतं.

 

होम सायन्स

  • न्यूट्रीशिअन, डाएटिशिअन, जिम ट्रेनर, स्पोर्टस फिटनेस यांना आजच्या फिटनेस काळात खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे ह्युमन डेव्हलपमेंट, होम टेक्सटाइल, क्वालिटी कंट्रोल अशा विषयांचाही होम सायन्समध्ये समावेश होतो.
  • होम सायन्स हे केवळ घरातल्या कामापुरतं किंवा मुलींपुरतं मर्यादित नाही. मुलांनाही करिअरसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

 

सीए/सीएस/आयसीडब्ल्यूए

  • कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर हे तीन महत्वाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए अभ्यासक्रम खूप महत्त्वाचे आहेत.
  • अकाउंटसमध्ये करिअर करायचं असेल तर चार्टर्ड अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट हे दोन पर्याय उत्तम. तसंच कंपनी कायद्यातील प्रावीण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स उपलब्ध आहे.
  • परंतु वर सांगितल्याप्रमाणे या कोर्समध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा अधिकाधिक कस लागतो. या व्यावसायिक अभ्यासक्रमाद्वारे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

 

मास मीडिया

  • कल्पकतेबरोबर भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर मास मीडिया हा एक पर्याय उपलब्ध आहे.
  • बीएमएम हा कोर्स करून पुढे पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करू शकता.
  • तसंच इव्हेंट मॅनेजमेंट, जाहिरात, पब्लिक रिलेशन असे कोर्सही करू शकता. स्वतंत्र लेखन यात करता येतं. या क्षेत्रामध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध आहेत.

 

कायदा

  • भारतासारख्या लोकशाही देशात उत्तम कायदा व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कायदा या विषयात चांगलं करिअर करता येतं.
  • लॉच्या अभ्यासक्रमाला कला, कॉमर्स आणि सायन्स अशा तिन्ही शाखांमधला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. कंपनी लॉ, लेबर लॉमध्ये स्पेशलायझेशनच्या संधी आहेत. बारावीनंतर पाच वर्षं किंवा पदवीनंतर तीन वर्षांचा कोर्स आहे.
  • त्याचबरोबर कामगार कायदा, बौद्धिक संपदा कायदा, करविषयक कायदे, बँकांचे कायदे, सायबरविषयक कायदे असे काही दूरस्थ शिक्षणाचे अभ्यासक्रमही आहेत.

 

हॉटेल मॅनेजमेंट

  • ज्यांना हॉटेलमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट हे फार विस्तीर्ण करिअर क्षेत्र उभं आहे. यात प्रतिष्ठा आणि पैसा प्रचंड आहे.
  • या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी हॉटेल मॅनेजमेंटकडे वळू लागले आहेत. या क्षेत्रात शेफ म्हणून काम करू शकता.

 

पॅरामेडिकल

  • पॅरामेडिकलच्या कोर्सेसची संख्या वाढते आहे. आज एमबीबीएस इतकंच महत्त्व पॅरामेडिकल अभ्यासक्रमाला आलं आहे. एक्सरे टेक्निशिअन्स, पॅथॉलॉजी, रेडीओ थेरपिस्ट या क्षेत्रांना खूप मागणी आहे.
  • नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. फिजिओथेरपिस्टसाठी आज अनेक संधी उलपब्ध आहेत. त्यातही वेगवेगळे स्पेशलायझेशनचे विषय निवडता येतात.

 

शेतीशास्त्र

  • तंत्रज्ञान कितीही विकसित झालं, लोकांचं आयुष्य कितीही बदललं तरी अन्न ही आपल्या जीवनासाठी एक मूलभूत गरज राहणारच आहे.
  • परंतु आपण मात्र पोटाला अन्न देणाऱ्या शेतीशास्त्राकडे दुर्लक्ष करतो. महाराष्ट्रात शेतीविषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या ४ संस्था आहेत.
  • अॅग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी, हार्टीकल्चर असे अभ्यासक्रम शिकवले जातात.

 

Read Article : वेब सीरिज इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाला माहित असणे आवश्यक असलेल्या 7 गोष्टी

 

बायफोकलचे प्रवेश ऑफलाइनच

  • सायन्स आणि कॉमर्स बायफोकलचे ऑडमिशन हे ऑफलाइन पद्धतीनं होतं. ऑनलाइन पद्धतीमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळतं, तिथे बायफोकल अभ्यासक्रम असतील.
  • तर तुम्हाला त्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो. संपूर्ण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली की बायफोकलसाठी आलेल्या फॉर्ममधून कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून मेरीट लिस्ट लावली जाते.
  • सायन्स आणि कॉमर्ससाठी बायफोकल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुमची अॅडमिशन तुमच्याच हातात आहे. सर्वप्रथम अॅडमिशनविषयक माहितीपुस्तिका नीट वाचा. त्यातल्या सूचना समजून घ्या.
  • तरच तुम्ही योग्य प्रकारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकाल. अॅडमिशनसाठी विभागीय मार्गदर्शन केंद्र आहेत. तसंच शाळेतले मुख्याध्यापक आणि शिक्षकांना याविषयीचं प्रशिक्षण दिलं आहे.
  • त्यामुळे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. तसंच जी वेगवेगळी सर्टिफिकेट्स प्रवेश घेताना सादर करावी लागतात, त्याचं ‘ऑथंटीकेशन’ करून घेणं आवश्यक आहे.
  • विभागीय मार्गदर्शन केंद्रांमध्ये सीबीएसई किंवा इतर बोर्डसमध्ये मिळणाऱ्या ग्रेड्स, मार्कांचं टक्केवारीत रुपांतर करून करून त्यासंबंधित योग्य छापील सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळतं.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *