Actor Arun Bali Passes Away: अभिनेते अरुण बाली यांचं निधन, दुर्मिळ आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर संपली
Actor Arun Bali Passes Away: चित्रपट आणि टीव्हीचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून गंभीर आजारांनी त्रस्त होते.
मुंबई- टीव्ही जगतापासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते गेल्या अनेक महिन्यांपासून मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिरानंदानी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ९० च्या दशकात केली होती. यानंतर त्यांनी राजू बन गया जेंटलमन, फूल और अंगारे, खलनायक, ३ इडियट्स आणि पानिपतसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय टीव्ही शो ‘बाबुल की दुआन लेती जा’ मालिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
अनेक टीव्ही मालिकांमध्ये केलं काम
अरुण बाली यांनी टीव्हीवरील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून खूप नाव कमावलं. त्यांनी’नीम का पेड़’, ‘दस्तूर’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘द ग्रेट मराठा’, ‘शक्तिमान’, ‘स्वाभिमान’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘वो रहने वाली महलों की’ आणि ‘देवों के देव महादेव’ या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं होतं.
प्रसिद्ध चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका
अरुण बाली यांनी बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक लोकप्रिय भूमिका साकारल्या. त्यांनी ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पोलिसवाला गुंडा’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’ या सिनेमांमध्ये काम केलं. तसंच ‘आँखे’, ‘जमीन’, ‘अरमान’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘३ इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एअरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानिपत’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.